पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरोनामुळे देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची चाकं थांबली आहेत. अशा संकट काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने देशातील विविध धार्मिक स्थळांच्या ट्रस्टमध्ये पडून असलेलं सोनं कर्जस्वरुपात ताब्यात घ्यावा, असा सल्ला काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. मात्र, यावरुन भाजपविरुद्ध काँग्रेस असं युद्ध पेटलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या काशी येथून मोठी बातमी समोर आली आहे.पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोनं ताब्यात घेण्याच्या वक्तव्यानंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतानी मोठा निर्णय जाहीर केला आहे.तो म्हणजे, पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आजीवन काशी विश्वनाथ मंदिरात बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर देशातील इतर ज्योतिर्लिंगाच्या पुरोहितांनीही चव्हाण कुटुंबाला मंदिरात प्रवेश नाकारण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर पृथ्वीराज चव्हाण हे मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचेही महंतांनी म्हटलं आहे.
काँग्रेसवर चोरीचा आरोप….
काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच 1983 च्या काळात काशी विश्वनाथ मंदिरात चोरी झाली होती. या चोरीत काँग्रेसने मुख्य भूमिका निभावली होती’, असा आरोप करत काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत आणि डॉ. कुलपती तिवारी यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. एवढंच नाही तर ते पूर्वाग्रहानं ग्रासलेले आहेत, असंही तिवारी यांनी म्हटलं आहे.काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?
कोरोना संकटकाळात अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकार पॅकेजच्या साहाय्यानं मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी, ‘वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणण्यानुसार, देशात 1 ट्रिलियन सोनं आहे. दोन-तीन टक्के व्याजदरावर सोनं सरकारला कर्जरूपानं ताब्यात घेता येईल आणि कालांतरानं परत करता येईल’, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं.
मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं लोकांपुढे मांडून धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोखरण अणुचाचणीनंतर तत्कालीन वाजपेयी सरकारनं सुवर्ण तारण योजना सुरू केली होती. मोदी सरकारनंही 2015 मध्ये नाव बदल करत ही योजना लागू केली, असं स्पष्टीकरणही चव्हाण यांनी दिलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात सरकारने देशातील विविध देवस्थानांकडे असलेलं सोनं कर्जस्वरुपात ताब्यात घेण्याच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.