विधानपरिषद नाराजी नाट्य : माजी मंत्री राम शिंदेही नाराज !

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज असलेल्या माजी जलसंधारणमंत्री राम शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने इतर मागासवर्गीय चेहरा म्हणून पुढे केले व सरकारमध्ये मंत्रिपद दिले होते. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याऐवजी धनगर समाजातीलच गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. पडळकर यांच्या पक्षातील वाढत्या प्रभावामुळे शिंदे यांची राजकीय कुचंबणा झाली आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींतून नाराज झाल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी धनगर समाजातील चेहरा म्हणून राम शिंदे यांना संधी दिली.अहिल्यादेवींचे चौंडी येथे स्मारक उभारण्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना मुंडे यांचा शिंदे यांच्याशी परिचय झाला होता. माळी-धनगर व वंजारी हे राजकारणातील ‘माधव’ गणित प्रबळ करण्यासाठी त्यांनी प्राध्यापक असलेल्या शिंदे यांना राजकीय ताकद दिली. चौंडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या शिंदे यांना थेट विधानसभेचीच उमेदवारी देण्यात आली. भाजप सरकारमध्ये पहिल्यांदा गृह खात्याचे राज्यमंत्रिपद आणि नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात आली. राजकारणात अत्यंत संवेदनक्षम असलेल्या नगर जिल्ह्य़ाचे पाच वर्षे पालकमंत्रिपद देण्यात आले. नितीन गडकरी यांनीही मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे यांना प्रचारासाठी नेले होते. मात्र आता त्यांना पडळकर यांच्यामुळे प्रतिस्पर्धी तयार झाल्याचे मानले जात आहे.
रोहित पवार यांच्याकडून शिंदे यांना जामखेड मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांना विधान परिषदेचा शब्द दिला होता. पडळकर हे पक्षात विधानसभेपूर्वी आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध त्यांना उभे करण्यात आले. मात्र प्रचंड मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांना आमदारकी मिळाली हे शल्य पक्षात व्यक्त केले जाते.

नगरसारख्या साखर सम्राटांच्या जिल्ह्यात आपण भारतीय जनता पक्षातून संघर्ष करत स्वकर्तृत्वावर राजकारणात स्थान मिळविले. पण पन्नास वर्ष राजकारणात सक्रि य असलेल्या एका घराण्यामुळे विधानसभेत माझा पराभव झाला. नगर जिल्ह्यातील सर्व आजी व माजी आमदारांनी एकमुखाने विधान परिषदेसाठी माझी शिफारस केली होती. निष्ठावंत म्हणून मला संधी मिळेल आणि राजकीय पुनर्वसन होईल, अशी मला अपेक्षा होती. पण पक्षाने विचार केला नाही. राजकारणात माझ्यावर कोणीही व्यक्तीगत टीका करू शकलेले नाही. राजकारणात लागते ते उपद्रवमूूल्य माझ्याकडे नाही. मी पक्षनिष्ठ आहे. त्यामुळे कदाचित माझ्यावर अन्याय झाला असावा. आजचा अन्याय हा उद्याच्या न्यायाची नांदीही असू शकतो.
– प्रा. राम शिंदे, माजी मंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here