पक्षांमधील एक प्रमुख स्पर्धक आहे तो कमी होईल म्हणून मला छळलं गेलं!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा विधानसभा निवडणुकीपासून राज्यातील नेत्यांवरील रोष वाढत चालला आहे. आपल्याला डावलण्याचे प्रयत्न होत असल्याचं ते म्हणाले होते. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राज्यातील नेत्यांचा नामोल्लेख टाळत हल्लाबोल केला आहे.
एका मुलाखतीत एकनाथ खडसे राज्यातील नेत्यांकडून होत असलेल्या निर्णयांवर टीका केली. त्याचबरोबर पक्षात जे सुरू आहे, त्याबद्दल वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचंही खडसे म्हणाले. “तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न होत आहे का?,” असा प्रश्न खडसे यांना विचारण्यात आला होता. त्यावरून खडसे यांनी राज्यातील नेत्यांवर निशाणा साधला.खडसे म्हणाले, “भारतीय जनता पार्टीमधील काही व्यक्ती मला जाणीवपूर्वक बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून अशा स्वरूपाचा छळ सुरू आहे. मला वारंवार छळलं गेलं. वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या निमित्ताने का होईना मी पक्षाबाहेर जाईल. पक्षामधला एक प्रमुख स्पर्धक आहे, तो कमी होईल. परंतु, मी पक्षाच्या ध्येय धोरणांशी आणि निष्ठेशी प्रामाणिक राहिलो आहे. पक्षामध्ये मी ज्यावेळी कामाला सुरूवात केली. आताचे नेते तेव्हा अर्धी चड्डी घालून, तर काहीजण चड्डीसुद्धा घालत नव्हते. काहीजण चड्डीत मुतायचे अशी स्थिती होती. आम्ही तेव्हापासून काम करत आहोत. अशा स्थितीत ज्या पक्षाशी आमची आपुलकी आहे. बांधिलकी आहे. त्यामुळे एकाएकी पक्ष सोडणं हे मला पटणार नव्हतं. दुसरीकडं काही नेत्यांना वाटत होतं की, मला असंच छळत राहायचं. तिकीट द्यायचं नाही. बदनाम करायचं. अपमान करायचा. त्यामुळे जनतेमध्ये अशी भावना झाली की, नाथाभाऊ इतका अपमान का सहन करतात? आजही हजारो कार्यकर्त्यांचे मला फोन येत आहे की, कशासाठी पक्षामध्ये राहत आहात. लोकांची भावना बदलत चालली आहे, पण मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी हे सहन करत आलो आहे. पण, यालाही काही मर्यादा आहेत,” अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी आपला रोष व्यक्त केला.