अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत प्रसंगी फेरविचार

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यातील अकृषी विद्यापीठातील 32 लाख विद्यार्थ्यांपैकी 25 लाख विद्यार्थ्यांच्या यावर्षीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. पदवीच्या अंतिम वर्षाला असलेल्या सात ते आठ लाख विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागत असल्याने या विद्यार्थ्यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. या परीक्षांच्या बाबतीत येत्या 20 जून रोजी आढावा घेऊ. त्यावेळी कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन परीक्षा घेण्याच्या निर्णयावर प्रसंगी फेरविचार करू.पण आता अभ्यास करा, तयारीत राहा असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.25 लाख विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय देशात सर्वात अगोदर महाराष्ट्राने घेतला आहे. राज्यातील विद्यापीठात शिकणार्‍या 32 लाख विद्यार्थ्यांपैकी 25 लाख विद्यार्थ्यांच्या यावर्षीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहेत. मात्र उर्वरित 7-8 लाख विद्यार्थी जे पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत, त्यांच्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे. परीक्षा होणार्‍या 7 ते 8 लाख विद्यार्थ्यांच्या पालकांनीही धीर धरावा. घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
यूजीसीला आम्ही राज्यातील सर्व परिस्थिती कळवणार आहोत. मात्र जोपर्यंत त्यांच्याकडून स्पष्ट सूचना येत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा होणारच असे समजूनच घरी राहून शांतपणे अभ्यास करावा. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्याच लागतील असे यूजीसीचे म्हणणे आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा समितीची बैठक होणार आहे. यावेळी आढावा घेतला जाणार आहे. असे सामंत यांनी सांगितले. नवे शैक्षणिक सत्र ऑगस्ट अथवा सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे यूजीसीने स्पष्ट केल्यानंतरच जुलै महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत नियोजन सुरु आहे.जुलैमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव राहिल्यास विद्यार्थी बाधित होऊ शकतात. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबतही फेरविचार करू, अशी ग्वाहीही उदय सामंत यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना यावेळी दिली.

खासगी, स्वायत्त विद्यापीठांनाही सूचना

स्वायत्त विद्यापीठे तसेच खासगी विद्यापीठांच्या परीक्षांबाबतही विद्यार्थ्यांना परीक्षांची चिंता आहे. मात्र येत्या दोन दिवसांत या स्वायत्त विद्यापीठांच्या कुलगुरूंनादेखील राज्य सरकारच्या वतीने पत्र जाईल. त्यांनाही राज्य सरकारच्या आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच निर्णय घ्यावयाचे आहेत. असे सामंत यांनी सांगितले.

परीक्षा शुल्कासंदर्भात बैठक होणार

परीक्षा काही दिवसात होणार होत्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या त्या विद्यापीठांना परीक्षा व अन्य फी भरली आहे. अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काबाबत निर्णय घेता येईल. राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी बैठक होणार असून त्या बैठकीत परीक्षा शुल्काबाबतचा निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थी-पालकांच्या हिताचाच विचार यावेळी करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी निश्चित राहावे असेही सामंत यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here