पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच महाविकास आघाडी ५ जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगीतले. महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते उपस्थित होते.विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरा उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. काँग्रेसच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज सायंकाळी बैठक पार पडलीयावेळी काँग्रेसने एक पाऊल मागे घेत एकाच जागेवर आपला उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले. बैठकीनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधून भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह भाजपानेही उमेदवारी जाहीर केली आहे. या ९ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात आल्याने निवडणूक होण्याची शक्यता मावळली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.
नऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल.. : संजय राऊत
महाराष्ट्र विधान परिषदेचया नऊ जागांसाठी निवडणूक बिनविरोध होईल, अशी आशा शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील करोना संकट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीचा विचार करून कॉंग्रेस पक्षाने एक ऊमेदवार मागे घेण्याची भूमिका घेतली. यासाठी मी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांचा आभारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ट्विटरवरून त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.