पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गृह मंत्रालयाने लॉक डाऊनची मुदत १७ मेपर्यंत दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची घोषणा करतानाच, हरित व नारिंगी क्षेत्रांमधील अनेक निर्बंध उठवले होते. ४ मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात हरित व नारिंगी क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.
हरित, नारिंगी व लाल या तिन्ही क्षेत्रांमध्ये, बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. यात ग्राहकांना एकमेकांपासून ६ फुटांचे अंतर राखावे लागणार आहे, तसेच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत हेही सुनिश्चित करावे लागणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र ) मद्यविक्रीस बंदी ठेवण्यात आली आहे.करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली होती. लॉकडाउन च्या दोन्ही टप्प्यात मद्यविक्रीवर बंदी होती. मात्र, ४ मे पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या टप्यात मद्यविक्रीला सशर्त परवाना देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं योग्य पालन केलं तर मद्यविक्रीची दुकानं सुरु केली जाऊ शकतात असे संकेत दिले होते.
लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर देशात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व राज्यांनी लॉकडाउनची कडक अमलबजावणी केल्यानं या काळात मद्यपींची दारुसाठी चांगली दैना झाली. केरळमध्ये तर मद्यपी आत्महत्या करत असल्याच्याही घटना समोर आल्या. देशभरात दारू विक्री बंदच होती. विशेष म्हणजे या काळात अवैध मार्गानं होणारी दारू विकणाऱ्यांवरही धाडी टाकण्यात आल्या.