पवनारच्या साई मंदिरात चोरीचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये कैद, व्हिडीओ व्हायरल

पवनार : साई भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या पवनार येथील साई मंदिरात सोमवारी मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिरात घुसून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाली असून, संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) रात्री अंदाजे दोनच्या सुमारास घडली. राऊत लेआऊटमधील साई मंदिरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करत दानपेटीवर हात साफ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडी तोडण्यात अपयश आल्याने चोरट्याचे उद्दिष्ट फसले आणि काहीच हाती न लागता तो पसार झाला.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक इसम मंदिराच्या परिसरात संचार करताना व दानपेटीशी झटापट करताना दिसत आहे. घटनास्थळावरील शांतता आणि मंदिर परिसरातील अंधाराचा फायदा घेत चोरट्याने आपले काम उरकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचे प्रयत्न फसले. बातमी लिहेपर्यंत या प्रकाराबाबत स्थानिक पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. मात्र, मंदिर व्यवस्थापन आणि ग्रामस्थांनी या घटनेबाबत गांभीर्याने दखल घेतली असून, लवकरच पोलिसांत तक्रार देण्यात येणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here