

वर्धा : विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे मराठवाड्यात आज आणि उद्या तर विदर्भातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात आजपासून पुढील ५ दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
तर यवतमाळ जिल्ह्यात आजपासून ३ दिवस आणि वाशीम जिल्ह्यात उद्या आणि सोमवारी काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात उद्या हलक्या पावसाची काही भागात शक्यता आहे. मराठवड्यातील काही भागात दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. धाराशीव, परभणी, नांदेड, जिल्ह्यात आज आणि उद्या काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यात आज आणि उद्या उष्ण तसेच दमट हवामानाचा अंदाज आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.