

पवनार : देशभरातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवत, “जागते रहो भारत” यात्रा सध्या वर्धा जिल्ह्यात दाखल झाली आहे. आठ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी राजस्थानमधून सुरू झालेल्या या यात्रेचा उद्देश केवळ मार्गक्रमण करणे नसून, समाज व शासन यांना महिलांच्या सन्मानाविषयी जागरूक करणे, असा आहे. यात्रेच्या सुरुवातीसाठी राजस्थानची निवड ही तिथे देशात सर्वाधिक महिलांवरील अत्याचार घडत असल्यामुळे झाली. राजकीय आणि प्रशासकीय आकडेवारीतून ही वस्तुस्थिती स्पष्ट होते, असे आयोजकांनी सांगितले. या यात्रेत विविध राज्यांमधील समविचारी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक-युवती सहभागी झाले आहेत.
महिलांवरील अन्याय, बलात्कार, छेडछाड, लैंगिक अत्याचार याविरुद्ध ठोस भूमिका घेणाऱ्या या चळवळीने आता महाराष्ट्रातील विदर्भात पाऊल टाकले आहे. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रम परिसरात यात्रा पोहोचली असता, स्थानिक संस्थांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळ, निसर्ग सेवा समिती आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त आयोजनातून सेवाग्राम येथील ऑक्सिजन पार्कमध्ये स्वागत सोहळा पार पडला. या वेळी बोलताना यात्रा संयोजक राजेंद्र यादव म्हणाले, गांधीजी, विनोबाजी, टुकडोजी महाराज आणि जमनालाल बजाज यांच्यासारख्या महापुरुषांची कर्मभूमी असलेल्या वर्धेतून मिळालेला प्रतिसाद हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
ते पुढे म्हणाले की, “आजही समाजात नारीशक्तीला दुय्यम स्थान दिलं जात आहे. पण ही यात्रा त्याविरोधात एक वैचारिक आणि सामाजिक लढा आहे. ही यात्रा केवळ महिलांसाठी नाही, तर संपूर्ण समाजाच्या नैतिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. सायंकाळी यात्रेतील सर्व सदस्यांनी बापूकुटीमध्ये गांधी प्रार्थना सत्रात सहभाग घेतला. पवनार आश्रमातील सायंकालीन विशेष सत्रात यात्रेतील अनुभव मांडताना, गौतमभाई बजाज आणि विनोबाजींच्या आश्रमातील पाच वयोवृद्ध भगिनींनी आपली मते मांडली. त्यापैकी ९४ वर्षीय उषा दीदी म्हणाल्या, “ही यात्रा चालूच राहायला हवी. ही लोकांच्या अंतःकरणाला भिडणारी चळवळ आहे.”
अखेरच्या दिवशी वर्धा शहरातील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात आयोजित स्वागत समारंभात बोलताना माधवी बहन यांनी सांगितले की, “आध्यात्मिक शक्तीच महिलांच्या सन्मानाचं खरं ब्रह्मास्त्र आहे. ही यात्रा त्याच ऊर्जेला समाजात जागं करत आहे. वर्धा जिल्ह्यातून पुढे ही यात्रा नागपूरमार्गे छत्तीसगडच्या दिशेने प्रस्थान करणार असून, प्रत्येक थांब्यावर विविध सामाजिक सत्रं, जनजागृती मोहिमा आणि संवादकार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.