
वर्धा : रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत. विद्यार्थ्यांनी आपला कम्फर्ट झोन सोडायला हवा. स्वत:ला ओळखून गरजेप्रमाणे कौशल्य वाढवायला हवे. संवाद कौशल्य वाढवणे ही काळाची गरज आहे. स्वत:त हे बदल केले तर नोकरी तुम्हाला शोधत येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले. आमदार अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून गोविंदराव फाऊंडेशनच्या वतीने येथील चरखा गृह येथे आयोजित पदवीधर रोजगार मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी होते. मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत सोनारे, वर्धा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष छोटूभाऊ चांदूरकर,रघुराम गायकवाड उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पदवीधर रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आ. ॲड. अभिजित वंजारी म्हणाले, कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची अनेक क्षेत्रात आवश्यकता आहे. मात्र, कंपन्या योग्य व्यक्तीपर्यंत अथवा संबंधित व्यक्ती कंपन्यांपर्यंत पोहचू शकत नाही. या दोहोंमधला दुआ बनण्याचे कार्य पदवीधर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गोविंदराव वंजारी फाऊंडेशन करत आहे. राज्यभरातील विविध नामांकित कंपन्या एकाच ठिकाणी आणून रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ कसा घ्यायचा, निवड झाल्यानंतर, ऑफर लेटर मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने कसे करायचे, हे उमेदवारांनी ठरवायचे आहे. आयुष्यात संधी वेळोवेळी मिळत नाही. मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले. येथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा कायम आता आमच्यासोबत जुळलेला असेल. ज्यांना नोकरी अथवा संधी या मेळाव्यात मिळाली नाही, त्यांच्यासाठी यापुढेही गोविंदराव फाऊंडेशन प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले. यावेळी मेळाव्यात सहभागी झालेल्या सुमारे 36 कंपन्यांच्या प्रतिनिधींचा आमदार अभिजित वंजारी आणि जिल्हाधिकारी श्रीमती वामन्थी सी. यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण वाट यांनी केले. आभार दीपक भोंगाडे यांनी मानले. मेळाव्यात हजारो पदवीधर युवक-युवती सहभागी झाले होते.
606 जणांना मिळाले ‘ऑफर लेटर’
पदवीधर रोजगार मेळाव्यात निर्मिती, ऑटोमोटिव्ह, आय.टी., बँकिंग, सर्व्हिस क्षेत्रातील सुमारे 36 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. कंपनीच्या प्रतिनिधींनी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेत योग्य उमेदवारांची निवड केली. सुमारे 606 युवक युवतींना आमदार ॲड. अभिजित वंजारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात आले.