सेलू : शासनाचा महसूल बुडवून अवैधरीत्या उत्खनन करून मातीची चोरट्या मार्गाने वाहतूक केल्याप्रकरणी कंत्राटदाराचे दोन टिप्पर महसूल विभागाने जप्त केले. ही कारवाई शनिवारी १४ रोजी तालुक्यातील वाघापूर परिसरात केली. जप्त केलेले टिप्पर धपकी येथील जय नारायण शर्मा नामक कंत्राटदाराचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
महसूल विभागाला वाघापूर परिसरातून अवैधरीत्या मातीचे उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी छापा घातला असता त्यांना जीजे ०२/७७७७७ व जीजे ०२/ २२७४७७ क्रमांकाचे दोन टिप्पर अवैधरीत्या मातीचे उत्खनन करून वाहतूक करताना आढळून आले. चौकशी केली असता चालकाने धपकी येथील जय नारायण शर्मा नामक कंत्राटदाराचे टिप्पर असल्याचे सांगितले. ही कारवाई तहसीलदार मलिक विराणी यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी रमेश भोले, तलाठी वर्षा वाघुले, तलाठी सुनील भट, तलाठी मंगेश ठमके, कोतवाल संदीप मुळे यांनी केली. अंदाजे २०० ब्रास मातीचे उत्खनन केल्याचे आढळून आले.