वर्धा जिल्ह्यात ‘लाडक्या बहिणींचा’ कौल ठरेल निर्णायक ; पाच लाख ५८ हजार महिला मतदार

वर्धा : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात जनतेने महायुतीला नाकारल्याने विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल आपल्यालाच मिळावा यासाठी महायुती सरकारने विविध योजनांचा पाऊस पाडला. यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि महिलांच्या बँक खात्यात अग्रिम स्वरूपात एक हजार पाचशे रुपये जमा केले. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सुमारे पाच लाख ५८ हजार लाडक्या बहिणींचा कौल कोणाला मिळणार हे विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला वर्धा लोकसभा मतदारसंघातील जनतेने मतांच्या रूपात पसंती दिली. लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल न मिळाल्याने होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने सावध भूमिका घेत मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी योजनांचा पाऊस पाडला. वर्धा जिल्ह्यात ११ लाख २८ हजार ३९२ मतदार आहेत. यापैकी पाच लाख ५८ हजार ७८१ महिला मतदार आहेत. त्यामुळे एकूण मतदारांपैकी महिला मतदारांची संख्या लक्षात घेता महायुतीने विविध योजनांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा कौल आपल्याला मिळावा, यासाठी महिलांनाच साद घातली.

निवडणुकीत महिला मतदारांचा महायुतीला किती फायदा होईल, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद पदाची निवडणूक असो मतदारांचा कौल त्या-त्या पक्षाचे भवितव्य ठरवतो. लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला मतदारांनी दिलेला झटका लक्षात घेता महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार राजावर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे महिला मतदारांची संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा विविध योजनांची घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here