पवनार : आगामी विधानसभा निवडणुका आणि सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पवनार गावात बुधवार (ता. ३०) रुट मार्च काढण्यात आला. ज्यामध्ये शसस्त्रसेना बलाची एक तुकडी दंगल नियंत्रण पथकाचा समावेश होता. कायदा- सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या उद्देशाने पोलिस उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर, ठाणेदार विनीत घागे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आला होता.
बसस्थान परिसर, ग्रामपंचायत कार्यालय, बाजार चौक, भोईपूरा, अन्नाभाऊ साठे वार्ड, सेवाग्राम रोड पर्यत हा रुट मार्च काढण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दल सज्ज आहे, असा संदेश या रुट मार्चमधून देण्यात आला. यावेळी १२० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचा या रूट मार्चमध्ये सहभाग होता. पोलिस प्रशासनाकडून अशा प्रकारे रुट मार्च काढण्यात आल्याने गुन्हेगार प्रवृत्तीचे तसेच अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये वचक निर्माण झाला आहे.