समुद्रपूर : रानावनात आढळणाऱ्या रानभाज्या लुप्त होत चालल्याने जनसामान्यात रानभाज्याविषयी जागृती आणि आहारात उपयोग व्हावा या हेतूने गिरड येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन शनिवारी 26 आक्टोबर 2024 रोजी करण्यात आले आहे. या निमित्याने मगन संग्रहालय समितीच्या गिरड येथील नैसर्गिक शेती विकास केंद्रात रानभाजी आणि पाककृतीची प्रदर्शनी लावण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत आयोजित रानभाजी महोत्सवात रानभाज्याची विविध पाककृती प्रदर्शनात उपलब्ध राहणार असल्याची माहिती आयोजकाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गिरड पंचक्रोशीतील शेतशिवारात आणि जंगल क्षेत्रात आढळून येणाऱ्या 50 पेक्षा जास्त रानभाज्या प्रदर्शनात ठेवण्यात येणार असून जुन्या जाणत्या आजिबाई रानभाजी महोत्सवात आपले अनुभव कथन करणार आहे.
रानभाजी महोत्सवाच्या उदघाट्न प्रसंगी मगन संग्रहालयाच्या अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता, गुरुकुल विद्या निकेतनच्या संचालिका सुषमाताई दुबे, वच्छलाताई खडसे, सीताताई दडमल, पुणे येथील बीज संवर्धक गणपत औटी, वनस्पती अभ्यासक प्रीतमराव व्यापारी गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
गिरड पंचक्रोशीत आढळून येणाऱ्या रानभाज्याची माहिती पुस्तिकाचे यावेळी प्रकाशन करण्यात येणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून गिरड पंचक्रोशीत आढळणाऱ्या वनभाज्या, त्यांची माहिती गुणधर्म आणि पाककृती जुन्या जाणत्या महिलाकडून संकलित करून नव्या पिढीला सुपूर्त करण्यात येणार आहे. जंगलात आणि रानात उपलब्ध विविध वनस्पतीचे खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुलांचा भाजी म्हणून कसा वापर करावा याकडे महोत्सवाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्यात येणार आहे.
सध्या उत्पादित होणाऱ्या हायब्रीड भाज्यांची मोठी मागणी असल्याने बेसुमार रासायनिक खतांचा, विषारी औषधांचा वापर केला जातो. यामुळे भाज्यातील नैसर्गिक चव, पौष्टिकता आणि नैसर्गिक गुणधर्माचा ऱ्हास झाला आहे. भाजींच्या पिकांवर जीवाणू, विषाणू, बुरशी व कीटकजन्य रोगांचा भडीमार होत असल्याने नियंत्रणासाठी जीवाणू- विषाणूनाशके, रासायनिक बुरशीनाशके, कीटकनाशके फवारतात. यामुळे सांधेदुखी, कॅन्सर, अल्सर, घशांचे, पोटांचे विकार आदी आजाराने रुग्ण त्रस्त आहे. यातून मुक्तता मिळविण्यासाठी निसर्गाने विविध गुणधर्माने समृद्ध अशा रानभाज्या आहे. मात्र यासाठी रानभाज्यांची ओळख असणे गरजेचे आहे. पारंपरिक भाजीपाला पिकांऐवजी रानभाज्या पर्याय आहे. हा विचार नव्या पिढीत रुजावा यासाठी गिरड पंचक्रोशीत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.