पवनार : ऋषिपंचमी निमित्ताने येथील धाम नदीपात्रात पूजा व आंगोळं करण्यासाठी आलेली महिला पाय घसरुन पडल्याने खोल पाण्यात बुडत असल्याचे पाहुन होमगार्ड सैनिक निकेश म्हैसकर आणि प्रफुल्ल मुंगले यांनी शर्थिचे प्रयत्न करीत महिलेला नदीपात्रातून बाहेर काढत तीचे प्राण वाचविले. ही घटना रविवार ता. ८ सकाळी ११ वाजताच्या सुमारास धाम नदिपात्रातील गायमुख कुंडात घडली. उज्वला दिलीप लोणारे वय ५५ वर्षे रा. वरोरा जिल्हा चंद्रपूर असे वाचविण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
पवनार येथील धाम नदीवर ऋषिपंचमी निमित्त्य पूजा व आंघोळ करण्याकरीता दुरवरुन मोठ्या संखेने महिला आल्या होत्या. पूजा करीत असताना खडकावरुन पाय घसरुन महिला नदीत खोल पाण्यात पडून बुडून गडांगळ्या खावू लागली. सोबत असलेल्या महिलांनी आरडाओरड करताच बंदोबस्तावर असलेले सेवाग्राम पोलिस स्टेशच्या दोन होमगार्ड सैनिकांनी महिलेला वाचविण्याकरीता खोल पाण्यात साडी सोडली. या साडीला महिलेने घट्ट पकडून घेतले त्यानंतर या दोघांनीही त्या महिलेला साडीच्या साहाय्याने ओढत नदीपात्रातून बाहेर काढत जीव वाचवला.
बुडालेल्या महिलेला पाण्याच्या बाहेर काढतांना अनेकांच्या अंगावर काटा आला होता. महिला पुर्णपणे भयभीत झाली होती. बाहेर काढल्यानंतर या महिलेला शांत करुन आपल्या गावी पाठविण्यात आले. पवनार येथील धाम नदी सध्या खळखळून वाहत आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरीता सेवाग्राम पोलिसांनी या परिसरात चोख बंदोबस्त लावलेला आहे. महिलेचे प्राण वाचविणाऱ्या या दोन्ही होमगार्ड सैनिकांचे सर्वत्र कौतूक होत आहे.