तेंदूपत्ता तोडणाऱ्याला वाघाने केले ठार! लिंगा मांडवी बीटातील घटना, मोठे धाडस करून पूर्वी पळविले होते अस्वलीला

कारंजा (घा.) : तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 65 वर्षीय व्यक्तीवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी (दि. 21) सकाळी 8 वाजताच्या सुमारास धावसा हेटी शिवारातील लिंगा मांडवी बिटात घडली. देवराव श्रावण राऊत (रा. ह. मु. धावसा हेटी) असे मृताचे नाव आहे.

देवराव राऊत हे मागील काही वर्षांपासून धावसा हेटी येथे राहतात. ते तेंदुपत्ता तोडण्यासाठी गावातील काही महिला- पुरुषांसोबत लिंगा मांडवी जंगल परिसरात गेले होते. त्यांच्यासोबत वन मजूरही होते. दाट जंगलात तेंदुपत्ता तोडत असताना सुरुवातीला त्यांना अस्वल दिसलो. पण त्यांनी स्वतःला सावरत आरडा-ओरड करून अस्वलीला जंगलात पिटाळून लावले. त्यानंतर देवराव व त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिला तसेच सहा ते सात पुरुष सहकाऱ्यांनी पुन्हा नव्या जोमाने तेंदुपत्ता गोळा करण्याच्या कामाला सुरुवात केली. अशातच देवरावसोबत असलेल्यांना झुडपातून न काहीतरी पळाल्याचा आवाज आल्याने त्यांनी देवरावळा आवाज दिला. पण, प्रतिसाद मिळाला नसल्याने तेंदुपत्ता गोळा करीत असलेल्यांनी देवराव याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

याच शोध मोहिमेदरम्यान देवरावचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आला. शिवाय काही अंतरावर झुडपात पट्टेदार वाघ असल्याचे तेंदुपत्ता तोडणाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मोठे धाडस करून वाघाला जंगलात पळून लावले. त्यानंतर संबंधित घटनेची माहिती वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्‍वर गजभिये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच कारंजा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here