क्षुल्लक वादातून पत्नीचा जीव घेणाऱ्या पतीला ठोठावली जन्मठेप! २० हजारांचा ठोठावला दंड; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा

हिंगणघाट : पत्नीची हत्या करणारा आरोपी सौरभ शिवदयाल गुप्ता (४०, रा. शिवाजी वॉर्ड) याला आजन्म कारावास तसेच, २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निर्वाळा जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी. शिंदे यांनी दिला.

सविस्तर असे की, ६ डिसेंबर २०२० रोजी आरोपी सौरभ गुप्ता आणि मृतक पत्नी श्वेता गुप्ता (3२) हे दोघेही घरी होते. दरम्यान, सौरभने श्वेताला मुलीला शांत करून जेवायला दे, असे म्हणत वाद केला. श्वेताने हटकले असता तिला काठीने मारहाण केली.वादानंतर श्वेता झोपली ती पुन्हा उठलीच नाही. आरोपीने श्वेताला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी शासनातर्फे पोलिस हवालदार विनोद कांबळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटणकर यांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.वर्धा येथील प्रथमश्रेणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. बी. शिंदे यांच्या न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. सरकारी अभियोक्ता म्हणून रश्मी सोमवंशी यांनी कामकाज पाहिले. शासनातर्फे एकूण १५ साक्षदार तपासण्यात आले. पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हवालदार रंजना झिलपे यांनी साक्षदारांना न्यायालयात हजर करून मोलाची कामगिरी बजावली, न्यायाधीश एन. बी. शिंदे यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकूण आरोपीला दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here