वर्धा : विविध हॉटेलला रेटिंग देऊन त्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष देत युवकाची ७ लाख ९६ हजार १०० रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना खरांगणा (मोरांगणा) येथे घडली. याप्रकरणी १५ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
अनिकेत प्रभाकर वाघमारे (२५, रा. खरांगणा मोरांगणा) याच्याशी अज्ञाताने मोबाईलवर संपर्क साधून व्हॉट्सअपवर विविध हॉटेलला रेटिंग देऊन त्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दिले. अनिकेतने याला प्रतिसाद दिल्याने त्याला वेळोवेळी वेगवेगळे टास्क देऊन त्या टास्कचे पैसे परत देण्यासाठी टॅक्सच्या स्वरुपात त्याच्याकडून ७ लाख ९६ हजार १०० रुपये ऑनलाईन उकळले. अनिकेतला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने याबाबतची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.