देवळी : शेतजमिनीच्या विक्रीपत्राची नोंदणी करून देण्यासाठी लाचखोर दुय्यम निबंधक कैलास शंकर गाढे (५४ रा. लक्ष्मीनगर, वर्धा) याने अर्जनवीस स्वप्नील ज्ञानेश्वर इंगोले (3५ रा. देवळी) याच्यामार्फतीने तक्रारदाराकडून आठ हजारांची रक्कम स्वीकारताना दोघांनाही अटक केली. ही कारवाई २३ रोजी रात्रीला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देवळी येथे करण्यात आली.
देवळी येथील तक्रारदाराला तालुक्यातील मिर्झापूर परिसरातील शेतजमीन खरेदी करायची असल्याने खसरा क्रमांक 3४ आराजी १.०२ हेक्टर आर जमिनीच्या विक्रीपत्राची नोंदणी करायची होती. मात्र, लाचखोर दुव्यम निबंधक कैलास गाढे याने विक्रीपत्राची नोंदणी करण्यासाठी तक्रारदाराला १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती आठ हजार रुपयांची लाच अर्जनवीस स्वप्नील ज्ञानेश्वर इंगोले याच्याकडून स्वीकारली. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडून अटक केली. दोघांविरुद्ध देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रीती शेंडे, नीलेश उरकुडे, हरीष गांजरे, दीपाली भगत, हर्षलता भरडकर यांनी केली.