वर्धा : चारचाकी काढण्यावरुन सुरू असलेल्या वाद सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पडेगाव येथे घडली. याप्रकरणी १० रोजी सावंगी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना ११ रोजी सकाळी अटक केली, तर दोन आरोपी अद्यापही फरारी आहे. सुनील नाने असे गंभीर जखमीचे नाव असून, त्याच्यावर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्यात अमोल शंकर पचारे, अनिकेत पारिसे यांचा समावेश आहे, तर दिलीप शंकर पचारे आणि सुंदराबाई पचारे हे दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
दिलीप गोविंद पुनसे हा त्याची कार काढत असताना आरोपी अमोल पचारे याने ट्रॅक्टर आडवा लावून वाहनासमोर उभा राहिला. दरम्यान, दिलीप पचारे, सुंदराबाई पचारे आणि अनिकेत पारिसे यांनी तु येथून जायचे नाही, असे म्हणत शिवीगाळ केली तसेच अमोलने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण सुरू असल्याचे पाहून जखमी सुनील नाने हा वाद सोडविण्यास मध्यस्थी गेला असता अमोल याने पकडून ठेवले आणि अनिकेत पारिसे याने जवळील चाकू काढून सुनीलच्या हातापायावर पाठीवर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. तसेच दिलीप पुनसे याच्या पत्नीलाही लाखाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी दिलीप पुनसे याने सावंगी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ घटनेची दखल घेत ११ रोजी सकाळी अमोल पचारे आणि अनिकेत पारिसे या दोघांना अटक केली तर दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती दिली.