
देवळी : अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारे तीन टिप्पर पोलिसांनी पकडले. आठ तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिघांना बेड्या ठोकल्या तर पाच तस्कर फरार आहेत. ही कारवाई २७ रोजी मध्यरात्री तालुक्यातील अडेगाव चौफुलीवर पुलगाव व देवळी पोलिसांनी केली.
मारोती बबन वराडे (रा. पार्डी, जि. यवतमाळ), किशोर जानराव मडावी (रा. हिवरादरणे, जि. यवतमाळ), विलास ज्ञानेश्वर भोयर (रा. शिरपूर होरे), चंदन रामदास पाटील (रा. शिरपूर होरे), बाबाराव गणपत चुटे (रा. शिरपूर होरे) अशी अटक केलेल्या तस्करांची नादे आहेत. सचिन बाबाराव दरणे (रा. हिवरा दरणे), रवींद्र वसंत भानारकर (रा. शिरपूर होरे) तर विलास मारोतराव फुलमाळी (रा. शिरपूर) हे तिघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अडेगाव परिसरातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती उपविभागीय पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ अडेगाव चौफुलीजवळ सापळा रचून मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास नाकाबंदी लावण्यात आली. काही वेळाने वाळूने भरलेले टिप्पर येताना दिसले.
पोलिसांनी टिप्परला थांबवून पाहणी केली असता, टिप्परमध्ये अवैधरित्या वाळू भरून विनापरवाना वाहतूक सुरू असल्याचे समजले. पोलिसांनी याप्रकरणी पाच तस्करांना अटक करून एमएच. २९ बीई, ६४६५४, एमएच.२९ टी. १८९३, एमएच.२९ टी. १४९६ क्रमांकाचे टिप्पर तसेच चार मोबाईल असा एकूण ४५ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण, उपविभाग पुलगाव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते, किशोर साखरे, धनंजय किटे, प्रणय इंगोले, शुभम कावडे, मनोज नप्ते, सलिम शेख यांनी केली.