सेवाग्राम : प्रत्येक सण आणि जयंतीच्या निमित्ताने आनंदाचा शिधा नागरिकांना मिळाला आणि पुढेही तो मिळणार होता. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेबे आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा रेशन कार्ड लाभार्थ्यांना मिळणार होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेमुळे गोरगरिबांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आता निकालानंतरच शिधा मिळणार असल्याने प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्र शासनाने दुर्बल घटक, सामान्य नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून सण, उत्सव आणि जयंतीच्या काळात आवश्यक असणारे साहित्य किरकोळ दराने वितरित करण्याचे धोरण अवलंबिले होते. याच अंतर्गत गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधामध्ये एक किलोप्रमाणे साखर, रवा, मैदा, चणा डाळ आणि सोयाबीन तेलाचे एक पॅकेट असे पाच साहित्यांचा संच मिळणार होता. तशी घोषणाही करण्यात आली होती. सेवाग्रामच्या जुन्या वस्तीत ६७० तर मेडिकल चौकातील स्वस्त धान्य अशा दोन दुकानात ७२८ असे एकूण १३७८ शिधापत्रिकाधारक आहे. त्यांना निकालानंतरच शिधा मिळणार आहे.