वर्धा : आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो…आपल्याकडून गोर गरीब, बेसहारा, अपंग, मतीमंद बालकांना मदतीचा हात असावा तसेच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे या उद्दात्त भावनेतून पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी सामाजिक दातृत्व दाखवून महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ९ रोजी शनिवारी पोलिस मुख्यालय परिसरात सुमारे दीडशेवर दिव्यांग बालकांसोबत जेवण करुन त्यांना गोड घास भरवत सामाजिक बांधिलकी जोपासत कोणत्याही क्षेत्रात असो सामाजिक सत्कर्म करता येते,याचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त पोलिस मुख्यालयाच्या परिसरात ९ मार्च रोजी शनिवारी दिव्यांग बालकांसाठी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी जेवण ठेवले होते. पोलिस मुख्यालय परिसरात आयोजित या अनोख्या कार्यक्रमात शहरातील शारदा मुकबधीर विद्यालय, श्री छाया बालगृह आणि तुकडोजी महाराज अंध विद्यालयातील जवळपास दीडशेवर बालके सहभागी झाली होती. यावेळी पोलिस अधीक्षक हसन यांनी बालकांसोबत संवाद साधून त्यांना आनंदीत केले. ही मुलं खरंच खूप हुशार असल्याचे मुलांसोबत गप्पा मारताना त्यांना जाणवले. त्यांनी स्वत:च्या हाताने सर्व बालगोपालांना लाडुचा गोड घास भरवून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.