हिंगणघाट : येथील रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या वना नदीवरील रेल्वेपुलावर रंगरंगोटीचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा पुलावरून तोल गेल्याने दोघेही पुलाखालील नदीपात्रात पडले. एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसर्या मजुराला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला. ही घटना रविवारी दि. १० रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने नोंद घेतली असून, सेवाग्राम पोलिसांनी मर्ग दाखल केल्याची माहिती दिली. विजयकुमार रामप्रसाद शर्मा, फरोज खान अशी मृत मजुरांची नावे आहे.
हिंगणघाट स्थानकावरून दिल्ली ते दोन्ही कन्याकुमारी असा वर्दळीचा रेल्वे महामार्ग आहे. वर्धा व हिंगणघाटच्या मध्ये हिंगणघाटजवळ वणा नदीवर लोखंडी रेल्वेपूल आहे. या पुलाला सध्या कंत्राटदाराच्या माध्यमातून रंगरंगोटीचे काम सुरू आहे. राजस्थान येथील कुटुंब पुलाच्या रंगरंगोटीच्या कामावर आहेत. मृत दोन्ही मजूर काम करीत असतानाच त्यांचा तोल गेल्याने ते नदीपात्रात पडले. यात दोघांचाही मृत्यू झाला, कंत्राटदाराने अपघातग्रस्त मजुरांना तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठवून स्वत: पळ काढल्याची माहिती आहे. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी मर्ग दाखल केल्याची माहिती दिली. तसेच आता पोलिसांकडून कंत्राटदाराचा शोध घेतला जात आहे.