कारंजा (घा.) : जेसीबीने शेतात शेणखत टाकण्याचे काम सुरू होते. यादरम्यान खत काढण्यासाठी जेसीबीचा फावडा वर उचलताच रस्त्याने घरी परतणाऱ्या गायी घाबरल्या आणि महामार्गाकडे सैरभैर पळाल्या, यादरम्यान महामार्गाने येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली असता तीन गायी ठार तर दोन गंभीर जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी सायंकाळी सात वाजतादरम्यान नागपूर ते अमरावती महामार्गावर ठाणेगाव शिवारात झाला.
ठाणेगाव (हेटी) येथील कांतेश्वर चौधरी यांच्या गायी नेहमीप्रमाणे शेतशिवारातून चराई करुन सांयंकाळी घराकडे निघाल्या होत्या. महामार्गाच्या बाजुलाच गावातीलच गोवर्धन सावरकर यांचा शेणखताचा उकिरडा आहे, आता उन्हा सुरु झाल्याने या उकिरड्यातील शेणखत काढून शेतात टाकण्याकरिता जेसीबी सांगितला होता. जेसीबीच्या सहाय्याने शेणखत काढण्याचे कामसुरु होते. कांतेश्वर चौधरी यांच्या गायी तेथून घराकडे जात असताना जेसीबी चालकाने खत काढण्यासाठी जेसीबीचे फावडे वर उचलेले. त्याचा आवाज होताच सर्व गायी बिथरल्या आणि सैरभैर पळायला लागल्या. या सर्वच गायी महामार्गावर पळायला लागल्याने तेवढ्यात नागपूर ते अमरावती महामार्गाने भरधाव जाणाऱ्या ट्रकची जबर धडक बसली. यात धडकेत तीन गायी जागीच ठार झाल्या तर दोन गायी गंभीर जखमी झाल्या आहे. अपघातानंतर पशुवैद्यकीय अधिकारी व पर्यवेक्षक घटनास्थळी पोहोचले जखमी गायींवर औषधोपचार केला. यात पशुपालकाचे तीन लाखांचे नुकसान झाले असून आता नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.