वर्धा : नागपूर येथून ‘एमडी'(मेफेड्रोन ड्रग) घेऊन वर्ध्यातील नागठाणा चौक परिसरात विक्री करण्यास आलेल्या तरुणीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडून कोठडीत डांबले. ही कारवाई ६ रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. तिच्याकडून ८४ हजार ८०० रुपयांचे एमडी ड्रग जप्त करण्यात आले.
ऐश्वर्या उर्फ आशू गजानन राऊत (२१, रा. शास्त्री वॉर्ड रामटेक, ह. मु. बेलतरोडी, जि. नागपूर) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘पेट्रोलिंग’ करीत असताना त्यांना नागपूर येथील ‘आशु’ नावाची तरुणी “एमडी’ नामक अमली पदार्थ घेऊन वर्ध्याला अवैधरित्या विक्री करण्यासाठी नागठाणा चौक, वर्धा बायपास रोड चिंतामणी लॉन समोर येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने आशु उर्फ ऐश्वर्या हिला अटक करून तिच्याकडून ८४ हजार ८०० रुपयांचे २० ग्रॅम २३ मिलीग्रॅम “एमडी’ (मॅफेड्रोन) जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, कांचन पांडे यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, हमीद शेख, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, यशवंत गोल्हर, महादेव सानप, पवन पन्नासे, रितेश शर्मा, मनीष काबंळे, गोपाल बावणकर, मंगेश आदे, गणेश खेवले, गजानन दरणे, अलका कुंबलवार, नीलिमा कोहळे, स्मिता महाजन यांनी केली.