इलेक्ट्रॉनिक वस्तुची हेराफेरी! पावणे नऊ लाखांवर मारला डल्ला; फसवणुकीचा गुन्हा दाखल

वर्धा : बजाज इलेक्ट्रिकल्स लि. कंपनीच्या सल्लागाराने पदाचा दुरपयोग करून मार्च २०२१ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत कंपनीच्या शोरूममधील ११२० इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची परस्पर हेराफेरी करून तब्बल आठ लाख ९० हजार ९६८ रुपयांचा अपहार करून कंपनीचा विश्‍वासघात करीत फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिसात प्रवीण देशमुख रा. गजानन विला बँक ऑफ इंडिया कॉलनी, याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

बजाज इलेक्ट्रिकल्स लि. कंपनीच्या वर्धा येथील शोरूममध्ये सल्लागार प्रवीण देशमुख हा कामकाज सांभाळत होता. १६ मार्च २०२१ पासून प्रवीण संतोष देशमुख हा बच्छराज रोडवर असलेल्या कंपनीच्या शाखेत सल्लागारपदी कार्यरत होता. शोरूममध्ये आलेल्या सर्व इलेक्ट्रिक साहित्याची देखरेख तसेच साहित्य विक्री करणे व त्याचे बिल बनवून कंपनीच्या खात्यात रक्‍कम पाठविण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. बजाज इलेक्ट्रिकल्सचे श्रीकांत प्रल्हाद दास यांना ऑडिटसाठी पाठविले असता त्यांनी केल्या ऑडिटमध्ये वर्ध्याला पाठविलेल्या साहित्यामधून दोन लाख ४५ हजार २४७ रुपयांचे फिनीश गुड आणि चार लाख ६८ हजार ५९५ रुपयांचे सेकंडरी कॅटेगिरी गुड असा एकूण १, १२० साहित्य कमी मिळून आले. विक्री केलेल्या साहित्याची १ लाख ७७ हजार १२६ रुपयांची रक्कमही कंपनीच्या खात्यात जमा न केल्याचे दिसून आले. प्रवीण देशमुखला नोटीस दिली असता त्याने कंपनीच्या मालाचे पैसे परत करण्यासाठी मुदत मागितली. त्याने दिलेला धनादेशही अनादरित झाल्याने न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. प्रवीण देशमुख याने परस्पर साहित्याची हेराफेरी करीन विक्री करीत तब्बल आठ लाख ९० हजार ९६८ रुपयांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याची तक्रार दास यांनी शहर पोलिसात दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here