वर्धा : मित्राच्या मदतीने स्वतःच्याच घरी चोरी करून मुलाने चक्क दागिने आणि रोख रकमेसह १० लाख २४ हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकत चौकशी केली असता मुलाने नोकरी मिळवून देण्याच्या लालसेतून मित्राच्या मदतीने चोरी केल्याची बाब तपासात पुढे आली. पोलिसांनी चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त करीत गुन्हा उघड केला.सिंदी मेघे परिसरातील घरपुरे लेआउट परिसरातील रहिवासी गोपाल यादव याच्या घरातून त्यांचाच मुलगा यश आणि त्याचा मित्र सारंग घरजाळे याने ४ लाख 3० हजार रुपयांची रोख रक्कम आणि दागिने असा १० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमेल चोरून नेला होता.
पोलिसांनी यादव कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. दरम्यान, मुलगा यशच्या बयाणावर संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवला असता सारंग घरजाळे याने नोकरी लावून देण्यासाठी पैसे मागितले होते. यशने सारंगला काही पैसे दिले होते. मात्र, आणखी पैसे त्यास द्यावे लागणार असल्याने यशने सारंगला सोबत घेत स्वत:च्याच घरात चोरी करण्याचा बेत आखून दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी यश यादव आणि त्याचा मित्र सारंग घरजाळे या दोघांना अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अलीम शेख, दिनेश कांबळे, धर्मेंद्र अकाली, अजय अनंतवार, गणेश सातपुते यांनी केली.