वर्धा : वाळू डेपोची ताबा पावती नसतानाही विनापरवानगी वाळूची तस्करी करून वाहतूक करणाऱ्या पाच जणांविरुद्ध कारवाई करीत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी याप्रकरणी दोन टिप्पर, जेसीबी आणि 3० हजार रुपयांची वाळू, असा एकूण ४९ लाख 3० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत देवळी पोलिसात गुन्हा दाखल केला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल डाहुले यांच्या नेतृत्वात चना टाकळी परिसरात रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
संतोष काशीनाथ नवरंगे, रा. गिरीपेठ कारला रोड, वर्धा आणि स्वप्नील वसंत घुंगरुड, स. गजानननगर, वर्धा अशी अटक केलेल्या वाळू चोरट्यांची नावे आहे, तर उमेश लक्ष्मण वगारहांडे, रा. जुनापाणी चौक, वर्धा, भारत भीमराव अवांडरे, रा. साटोडा, वर्धा, चमनकुमार मांजी, रा. जोहरी चिन्न खुंती, झारखंड हे फरार असल्याची माहिती देवळी पोलिसांनी दिली आहे. चना टाकळी गावाच्या बाहेर शेतात असलेल्या वाळू डेपोतून ताबा पावती असतानाही अवैधरीत्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल डाहुले, पोलिस उपनिरीक्षक आश्विन गजभिये यांनी कर्मचाऱ्यांसह वायगाव चौरस्ता येथे नाकाबंदी केली असता एमएच 3१ सीबी ९७७१ क्रमांकाचा आणि एमएच 3१ क्यू ६४६२ क्रमांकाचा टिप्पर येताना दिसला. दोन्ही टिप्परला थांबवून पाहणी करीत परवानगी विचारली असता कुठलीही पावती त्यांच्याकडे नव्हती. पोलिसांनी डेपो गाठून एमएच 3२ एच ५११२ क्रमांकाचा जेसीबी आणि दोन टिप्पर आणि ६०० फूट काळी वाळू, असा एकूण ४९ लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत देवळी ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला.