तळेगाव (श्याम.पंत.) : नागपूर जिल्ह्यातून अवैधरीत्या जनावरे कोंबून काही वाहने अमरावतीकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आष्टी टी-पॉइंटवर नाकेबंदी केली असता चार मिनी ट्रक भरधाव पळाली. पोलिसांनी पाठलाग करून दोन मिनी ट्रक रोखले, पण दोन वाहने पळून जाण्यात यशस्वी झाली. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता केली.
नागपूर जिल्ह्यातील काटोल येथून चार मिनी ट्रकात जनावरे कोंबून अमरावतीकडे जात होती, याची माहिती मिळताच पोलिसांनी आष्टी टी- पॉइंटवर नाकेबंदी केली; परंतु या मार्गावर इतर ट्रक उभे असल्याने पोलिसांची नजर चुकवून चारही वाहनांनी अमरावतीच्या दिशेने पोबारा केला. पोलिसांच्या लक्षात येताच सिनेस्टाईल पाठलाग करून एम. एच.११ बी. एल.१६३७ आणि एम. एच.१६ ए. वाय.१४७५ क्रमांकाची दोन वाहने पकडण्यात पोलिसांना यश आले, तर दोन वाहने पसार होण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या दोन वाहनांतून २ लाख ७० हजार रुपये किमतीचे २८ गोवंश, १० लाखांची दोन वाहने, दोन मोबाईल असा एकूण १२ लाख १८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शेख अफसर नजीर अहमद (वय २७) व मोहम्मद अक्रम (२८) या दोघांना अटक करण्यात आली. ही सर्व जनावरे संत लहानुजी महाराज देवस्थान, टाकरखेडा येथील गोरक्षण येथे पाठविण्यात आली. पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सोनपरोते, ज्ञानोबा पळणाटे, मनोज आसोले, निखिल काळे, अतुल अडसड, ‘परबत, श्रीकांत नलावडे, गजानन साबळे यांच्यासह तळेगाव पोलिस कर्मचारी करीत आहे.