चेन कन्व्हेअरमध्ये दबून कामगार ठार! एक गंभीर; महाराष्ट्र विद्युत निगमच्या हलगर्जीपणामुळे अपघात

देवळी : स्थानिक औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र विद्युत निगम प्रा.लि.च्या कारखान्यात चेन कन्व्हेअर मशीनमध्ये दबून एक कामगार ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी झाला. या कारखान्यात बायोमासपासून विद्युत निर्मिती करण्यात येते. गेल्या वीस वर्षांपासून हे युनिट येथे कार्यरत आहे. हा अपघात कारखान्यातील ऑपरेशन मॅनेजरच्या चुकीमुळे झाल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र विद्युत निगम प्रा. लि. कारखान्यात गुरुवारी फिटर दिनेश मोकडे रा. वर्धा व लेबर विक्रम तेलरांधे रा. देवळी हे दोघेही चेन कन्व्हेअर मशीनवर कॉर्टर पिन काढण्याचे काम करीत होते. याच दरम्यान कारखान्याच्या ऑपरेशन मॅनेजरने चेन कन्व्हेअर मशीन सुरू केल्याने यात दोन्ही. कामगार दबल्या गेले. या भीषण अपघातात फिटर दिनेश मोकडे याचा मशीनमध्ये गुंडाळून कंबरेपासूनचा भाग चेंदामेंदा झाला होता. त्याला तातडीने सावंगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता त्याचा मृत्यू झाला. तर विक्रम तेलरांधे याच्या पायांना दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहे. तसेही विद्युत निगम कारखाना प्रशासन नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे. कार्यरत कामगारांना कोणतेही सुरक्षा साहित्य पुरविले जाते नसल्याच्या तक्रारी आहे.

तसेच बायोमासचा हा कारखाना नावालाच असून प्रत्यक्षात कोळशाचा वापर करून वीज निर्मिती केली जात आहे. शासनाच्या सवलती लाटण्यासाठी बायोमासचा देखावा केला जात असल्याचे सांगितले जात आहे. मृतक मोकडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी कामगार व नातेवाइकांकडून केली जात आहे. दिनेशच्या पश्‍चात पत्नी तसेच मुलगा व मुलगी असा आप्तपरिवार आहे. कारखान्याच्या प्रांगणात कामगारांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली. या घटनेनंतर कामगार आणि मृताच्या परिवारातील सदस्यांमध्येही रोषाचे वातावरण आहे. त्यांनीही कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्‍त केला असून कारवाई झाली नाही तर आंदोलनाची भूमिका व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here