वर्धा : मालवाहू वाहनातून अवैधरीत्या सुरू असलेली जनावरांची वाहतूक पोलिसांनी तब्बल २२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून रोखली. ही कारवाई सेलू पोलिसांनी ९ रोजी रात्री सेलू ते येळाकेळी रस्त्यावर नाकाबंदीदरम्यान केली. पोलिसांनी दोघांना अटक करून ११ जनावरांची सुरक्षितरीत्या सुटका करून वाहनासह १४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला.
दानिश रजा कादर शेख (२५, रा. पुलफैल, वर्धा), फारुख अली जाकीर अली (२५, रा. कळंब, जि. यवतमाळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. (एमएच 3२ एजे ४४८५) क्रमांकाच्या मालवाहू वाहनात जनावरे दाटीवाटीने कोंबून येळाकेळीकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सेलू ते येळाकेळी रस्त्यावर सापळा रचला असता भरधाव मालवाहू येताना दिसला. पोलिसांना पाहताच मालवाहू सुसाट झाला. जवळपास २२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून मालवाहू पकडून पाहणी केली असता वाहनात जनावरं कोंबून वाहतूक सुरू असल्याचे दिसले. पोलिसांनी ११ जनावरांची सुखरूप सुटका करून पीपल फोर अनिमल संस्थेत पाठविले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक तिरुपती राणे, गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे यांनी केली.