वर्धा : जिल्ह्यातील 19 पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये मोहीम राबवून जिल्ह्यात अवैधरित्या दारूविक्री तसेच वाहतूक करणाऱ्यावर 19 आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाई तब्बल 1 लाख 89 हजार 500 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. ही मोहीम जिल्हा पोलिसांनी एकत्रित राबविली असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बातमीदाराकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून आरोपी सिमा पाला (49, रा. ईतवारा बाजार कंजरमोहल्ला) हिच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून रनिंग भट्टीचे 5 लोखंडी ड्रममध्ये 500 लीटर उकडता मोहा सडवा रसायन किंमत 25 हजार रुपये, 5 लोखंडी ड्रम, 5 जर्मन घमिले, 5 प्लास्टीक डबकीमध्ये 60 लीटर गावठी मोहा दारू किंमत 7 हजार रुपये, 15 लोखंडी ड्रमध्ये 3 हजार लिटर कच्चा मोहा रसायन सडवा किंमत 1 लाख 50 हजार रुपये, 15 लोखंडी ड्रम किंमत 7 हजार 500, इतर भट्टी साहित्य किंमत 2 हजार रुपये, असा एकूण 1 लाख 96 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.