वर्धा : कार्यक्षेत्र सोडून पैसे गोळा केल्याच्या कारणातून तृतीयपंथीयांच्या दोन गटात चांगलाच सिनेस्टाईल राडा झाला. ही घटना हिंगणघाट शहरातील जुन्या श्रीराम वॉर्डात घडली. भर रस्त्यात झालेला हा राडा कॅमेऱ्यात अनेकांनी कैद केला असून सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील होत आहे.
एका गटाने दुसऱ्या गटाला चांगलीच मारहाण केली. हे पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी होती. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना समज देत १४९ अंतर्गत नोटीस बजावली. तृतीयपंथीयांनी पैसे गोळा करण्यासाठी आपापले कार्यक्षेत्र वाटून घेतले आहे. अशातच शुक्रवारी सायंकाळपासूनच नागपूर येथील नऊ ते दहा तृतीयपंथीयांच्या एका गटाने त्यांचे कार्यक्षेत्र सोडून हिंगणघाट शहरात बस्तान मांडून नागरिकांकडून पैसे गोळा करण्याचे काम सुरू केले. शनिवारी याची माहिती वर्ध्यातील तृतीवपंथीयांच्या गटाला मिळताच त्यांनी सिनेस्टाईल पद्धतीने ऑटोने हिंगणघाट येथील जुन्या श्रीराम वॉर्डात जात नागपूर येथून आलेल्या गटाला थेट मारहाण करायला सुरुवात केली. तृतीयपंथीचे दोन गट आपसात भिडत असल्याचे पाहून नागरिकांनीही चांगलीच गर्दी केली होती. काहींनी या घटनेचा व्हिडीओ त्यांच्याकडील मोबाईलमध्ये कैद केला.