देवळी : पोलिस असल्याची बतावणी करीत शेतकऱ्याला रस्त्यात थांबतून पावणे दोन लाखाचा ऐवज लुटला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजतादरम्यान भिडीनजीकच्या बंडू डफरे यांच्या शेतानजीकच्या पुलाजवळ घडली.
हुसनापूर येथील शेतकरी तुकाराम घनश्याम वरफडे हे डवऱ्याचा दांडा तुटल्याने त्याला वेल्डिंग करण्यासाठी दुचाकीने भिडीला जात. होते. यादरम्यान त्यांना मागाहून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांनी थांबण्यास सांगितले. त्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून आवाज दिल्यानंतर थांबता येत नाही का? अशी दमदाटी केली. तसेच हायवेवर चेकिंग सुरू असल्याने गळ्यातील सोन्याची साखळी व हातातील अंगठी काढून गाडीच्या डिक्कीत ठेवण्याची सूचना केली. यादरम्यान मागावरून दुसरी दुचाकी आली असता त्यांना सुद्धा अडवून अंगावरील सोने काढण्यास सांगितले. त्यांनी नकार दिला असता मोठ्या आवाजात समज देण्याचे नाटक करण्यात आले. त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सोन्याचे साहित्य बाहेर काढले व तोतया पोलिसांच्या हाती गाडीच्या डिक्कीत ठेवण्यासाठी दिले.
हा सर्व प्रकार पाहून वरफडे यांनी सुद्धा सोन्याचे साहित्य काढून तोतया पोलिसांच्या हाती दिले. पोलिसांनी वरफडे यांच्याकडील सोने पांढऱ्या कागदात गुंडाळून गाडीच्या डिक्कीत ठेवण्याचे नाटक केले. सोन्याच्या पुडीच्या जागी दगडाची पुडी ठेवून हातचलाखी केली. त्यांनी वरफडे यांना भिडीच्या रस्त्याने जाण्यास सांगून ते विरुद्ध दिशेने निघून गेले. पोलिसांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने वरफडे यांनी डिक्कीतील पुडी पाहली असता त्यात दगड आढळून आले. फसगत झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी देवळी पोलिसांत धाव घेतली.