वर्धा : हॉटेलात सुरु असलेल्या ओल्या पार्टीत चक्क हरिणाच्या मांसावर ताव मारणाऱ्या दोन आरोपींना वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई १० रोजी रात्रीच्या सुमारास सावंगी हद्दीतील टी पॉईंटवर असलेल्या ठाकरे किचन हॉटेलात करण्यात आली.प्रभाकर चोंदे रा. सावंगी मेघे, सुमीत मुन रा. कंरजी भोगे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून वन गुन्हा दाखल केल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी दिली.
सावंगी परिसरातील टी पॉईंट परिसरात असलेल्या ठाकरे किचन नावाच्या हॉटेलात सहा ते सात जणांनी ओली पार्टी करीत चक्क हरिण शिजवून मासांवर ताव मारल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वनपरीक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांनी कर्मचाऱ्यांसह ठाकरे किचन हॉटेलात जात तपासणी केली असता मासांचे तुकडे मिळाले. त्या मांसाचे नमुने जप्त करुन पार्टीत असलेले प्रभाकर चोंदे आणि सुमीत मुन या दोघांना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरु असून त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती खेडकर यांनी दिली.