वर्धा : एक किलो वजनाच्या सोन्याच्या हाराचे आमिष दाखवून दहा लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्र फिरवून दोन गुन्हेगारांपैकी एकाला अटक केली तर दुसरा फरार झाला आहे.
नईमुद्दीन मोहियोद्दीन काजी रा. चंद्रपूर यांच्याकडे काही दिवसांपूर्वी दोन व्यक्ती आले. त्यांनी एक सोन्याचा तुकडा नईमुद्दीन यांना दाखवत हे सोने खोदकामात सापडल्याने सांगितले. तसेच १ किलो वजनाचा सोन्याचा हा त्यांच्याजवळ असून तो दहा लाखांत विकायचा असल्याचेही सांगितले. त्याला नईमुद्दीन यांनी होकार दर्शविल्यानंतर ३ आॅक्टोबरला जाम चौरस्त्यावर नईमुद्दीन काजी व त्यांचा मुलगा कारने आला. तेथील एका चहा टपरीवर प्रभु लालसिंग चव्हाण (४२) रा. वानखेडे ले-आऊट, उमरेड व रुपसिंग लक्ष्मणसिंग चव्हाण रा. जोगिठाणा पेठ, उमरेड या दोघांना दहा लाख रुपये देऊन त्यांच्याकडून हार खरेदी केला.
तो हार कारमध्ये घेऊन बापलेक चंद्रपूरकडे रवाना झाले. रस्त्याने जाताना त्यांनी हाराची पाहणी केली असता तो बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी समुद्रपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी तपासाला गती देत पोलिसांनी प्रभु लालसिंग चव्हाण याला अटक केली असून रुपसिंग चव्हाण फरार झाला. आरोपीकडून दहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या निर्देशानुसार पोलिस उपनिरीक्षक अनिल देरकर, पंकज मसराम, अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, वैभव चरडे यांनी केली.