

वर्धा : मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी व मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवाटर ॲक्वाकल्चर, भुवनेश्वर या संस्थेमार्फत कमी खर्चात मत्स्यखाद्य उत्पादन व आहार याबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
पिंजरा प्रकल्प व इतर प्रकल्पासाठी लागणारे मत्स्यखाद्य कमी खर्चात कसे उत्पादन करावे व मत्स्यखाद्याचा वापर यावर प्रशिक्षणामध्ये भर देण्यात आला. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवाटर ॲक्वाकल्चरचे संचालक डॉ. पी. के. साहू व सहसंचालक डॉ. एम. जी. सिदय्या यांनी प्रशिक्षणात विशेष मार्गदर्शन केले.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत भूजलाशीयन पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प राबविणारे एमएसडी ॲक्वाकल्चर, नागपूरचे सीईओ मयंक सिंग यांनी सदर प्रशिक्षण घेतले. याबद्दल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय प. दे बसवंत यांनी श्री. सिंग यांचे अभिनंदन करुन प्रशिक्षणाचा लाभ वैयक्तिक तसेच इतर मत्स्यशेतकरी, प्रकल्पधारकांना सुध्दा द्यावा, असे सांगितले. जिल्ह्यातील इतर प्रकल्पधारक शेतकऱ्यांनी सुध्दा या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहे.