वर्धा : दिव्यांग व्यक्ती शरीराने अपंग असला तरी बुद्धीने मात्र तो हुशार असतो. या व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करत मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची चांगली अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
चरखा सभागृह येथे जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभागाच्यावतीने अलिम्को कंपनी मार्फत दिव्यांगांना साहित्य वितरणाच्या जिल्हास्तरीय शुभारंभाप्रसंगी श्री. आठवले बोलत होते. कार्यक्रमाला खा. रामदास तडस, आ.डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सेवाग्रामच्या सरपंच सुनिता ताकसांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील गफाट, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय आगलावे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे, मुख्याधिकारी राजेश भगत आदी मंचावर उपस्थित होते.
दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकरीमध्ये आरक्षणासोबतच शिष्यवृत्ती योजना, रेल्वेसह बसमध्ये प्रवास सवलत आदी योजना राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्यावतीने दिव्यांगांसाठी सुगम्य भारत अभियान राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथे त्यांच्यासाठी सोई सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. सरकारी शाळांमध्ये शौचालय, रॅम्पची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. दिव्यांगांना राहण्यासाठी अपंग पुनर्वास केंद्र निर्माण करण्यात आले असल्याचे पुढे बोलतांना रामदास आठवले यांनी सांगितले.