अल्लीपूर : यवतमाळ येथे नर्सिंगचे धडे घेणारी २१ वर्षीय शामल उत्तम वैद्य ही सुटी असल्याने मूळ गावी अल्लीपूर येथे परतली. याच युवतीचा राहत्या घरी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.
स्थानिक जय भीम वॉर्ड येथील रहिवासी उत्तम वैद्य यांना चार मुली असून सर्वात मोठी मुलगी करिष्मा हिचा विवाह झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाची मुलगी प्रतीक्षा ही नागपूर जामठा येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून सेवा देत आहे. तृतीय क्रमांकाची मुलगी प्रांजल ही चंद्रपूर येथे नर्स म्हणून सेवा देत आहे. तर शामल ही यवतमाळ येथे नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करीत होती. सलगच्या सुटीमुळे ती मूळ गाव असलेल्या अल्लीपूर येथे आली होती. आई शेतात तर वडील कामानिमित्त घराबाहेर गेल्याने दुपारच्या सुमारास शामल ही घरी एकटी होती. कुटुंबीय घरी परतल्यावर शामल हिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत घरात दिसून आल्याने त्यांनाही धक्काच बसला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.