सिंदी (रेल्वे) : कांढळी रस्त्यावरील अमोल दांडेकर यांच्या दुचाकी दुरुस्तीच्या दुकानाला आग लावून चार दुचाकींची राखरांगोळी झाली होती. ही घटना १८ रोजी रात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान घडली होती. याप्रकरणातील आरोपी सौरभ विठ्ठल सातपुते (रा. दिग्रज) याला पोलिसांनी अटक करुन गुन्हा दाखल केला.
प्राप्त माहितीनुसार, अमोल दांडेकर याचे ऑटोमोबाइल सव्हिस सॅटर असून, दुचाकी दुरुस्तीचे काम केले जाते. दुकानासमोर २ मोपेड व मोटारसायकल उभ्या होत्या. आरोपीने ४ पैकी १ गाडीला आग लावली व चारही दुचाकी आगीच्या कवेत आल्या. परिसरातील लोकांच्या निदर्शनात येताच दुकानातील साहित्य वाचविण्यासाठी धावपळ करून नगरपालिकेचा पाण्याचा टँकर बोलावून आग विझविण्यात आली
या घटनेनंतर आरोपीने लगेच २ दिवसांनी २० रोजीच्या मध्यरात्री दिग्रज येथे अमोल दांडेकर यांच्या कारलासुद्धा आग लावली. दांडेकर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत रोडवरील दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत अटक केली. आरोपी हा बाहेरगावातील रहिवासी असून, तो बांधकामाच्या कामासाठी दिग्रज येथे वास्तव्यास आला होता. ही कारवाई पोलिस निरीक्षक वंदना सोनुने यांच्या निर्देशात कैलास हरणे यांनी केली.