वर्धा : फेसबुक या सोशल साईटवरून शेती साहित्य खरेदी करणे तरुणाला चांगलेच भोवले असून १ लाख ७७ हजार ६४० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना पवनार गावात घडली. याप्रकरणी १३ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
सचिन नारायण दानव (३२, रा. पवनार) हा फेसबुक अकाऊंट हाताळत असताना त्यावर शक्तीवान इंजिनीअरिंग ट्रॉली या कंपनीची जाहिरात दिसली. त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क केला असता, आरोपींनी त्याला संपूर्ण माहिती दिली. सचिन याने रोटावेटर, नांगर, तीरी, पंजी, व्ही पास, एक्का अशा शेती साहित्यांची ऑर्डर देत त्याचे बिल मागितले. त्या बिलावर शक््तीवान इंजिनीअरिंग प्रा, लि. लिहिले होते. बिलावर असलेल्या आयएफसी कोडवरून सचिनने १ लाख ९२ हजार ६४० रुपये धनादेशाद्वारे दिले मात्र, आरोपीने दिलेल्या ऑर्डरप्रमाणे साहित्य उपब्लध करून न देता दोनदा प्रत्येकी ५ हजार व १० हजार असे एकूण १५ हजारांची रक्कम अकाऊंटवर परत पाठवून उर्वरित १ लाख ७७ हजार ६४० रुपयांना गंडविले. सचिनने याबाबतची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.