वर्धा : देशाचे व्यापक सामाजिक, राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांचे मोठे योगदान आहे. देशाला जागतिकस्तरावर पुढे ठेवण्यासाठी यापुढे देखील या संस्था महत्वाचे योगदान देतील. नव्या शैक्षणिक धोरणाने परिवर्तनाचा दृष्टीकोण ठेवला आहे. हे धोरण नव्या पिढीला मातृभाषेत शिक्षणाला प्रोत्साहन देते. युवकांनी देशाला सर्वच क्षेत्रात पुढे नेण्यासाठी तयार झाले पाहिजे, असे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.
महाकाली शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व शिवशंकर सभागृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नागपूर विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. सुभाष चौधरी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे उपकुलपती डॉ. प्रशांत बोकारे, महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री, आ.डॉ. पंकज भोयर, आ.दादाराव केचे, पोलिस अधीक्षक नूरुल हसन, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते.