वर्धा : जिल्हा प्रशासनासह केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्र मंडळाकडून प्राप्त सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धा नगरपालिकेने ‘पीओपीच्या गणेशमूर्ती विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी काही मूर्ती विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांत जात पालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. दोन ठिकाणी पीओपीच्या गणेशमूर्तीची विक्री होत असल्याचे लक्षात आल्याने या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवार्ड करण्यात आली आहे.
वर्धा शहरात काही ठिकाणी पीओपीच्या गणेश मूर्तीची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांच्या सूचनेनुसार पालिकेचे पथक अँक्शन मोडवर आले. पथकातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातील काही मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानात जात पीओपीच्या मूर्तीची विक्री तर होत नाही ना याची शहानिशा केली. पीओपीच्या मूर्तीची विक्री केली जात असल्याचे लक्षात येताच दोन व्यावसायिकांना दंड ठोठावत त्याची वसुली करण्यात आली. ही कारवाई वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता निरीक्षक विशाल सोमवंशी, निखिल लोहवे, स्वप्निल खंडारे, अशोक ठाकूर, विशाल नाईक, आदींनी केली.