पवनार : कळपातून भटकलेला रोही गावात शिरला मात्र गावातील कुत्रांनी त्याच्यावर हल्ला चाढवत त्याचे लचके तोडले. ही घटना मंगळवार (ता. २५) सकाळी सात वाजताच्या सुमारास पवनार परिसरात घडली. माहिती मिळताच वनविभागाचे दोन कर्मचारी घटनास्थळी येत जखमी रोह्याला ग्रामस्थांच्या मदतीने पिपल्स फॉर अॅनिमल्स येथे उपचारार्थ घेवून गेले मात्र उपचारादरम्यान त्या रोह्याचा मृत्यू झाला.
शेतशीवारातून जात असताना एक रोही कळपातून भटकला. तो थेट गावाच्या हद्दीत आला या प्राण्याला पाहताच कुत्र्यांनी शिकारीच्या उद्देशाने त्याच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात कुत्र्यांनी त्याच्या मांडीचे पोटाचे लचके तोडले जीव वाचविण्यासाठी रोही थेट घराच्या कुंपनात शिरला. ग्रामस्थांच्या ही बाब नजरेत येताच त्यांनी कुत्र्यांना हाकलून लावत या रोह्याची कुत्र्यांच्या तावडीतून सूटका केली. कुपनाचा दरवाजा बंद करुन ग्रामस्थांनी त्याच्यावर पाळत ठेवली.
या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे दोन कर्मचारी घटनास्थळी येत जखमी रोह्याला पकडण्याचा प्रयत्न करीत होते मात्र पकडण्याचा प्रयत्न करताच रोही भितीपोटी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. आधीच कुत्र्यांनी लचके तोडल्याने जखमी झालेला रोही पाच फुट उंच भिंत उडून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता मात्र त्याला ते शक्य होत नव्हते वारंवार तो खाली पडत होता. याच प्रयत्नात तो कंपाउन्डची भिंत तोडून बाहेर निघाला आणि बाजूच्या ताराच्या कुंपणात जावून अडकला. त्यातून बाहेर पडण्यासाठी तो प्रयत्न करीत असताना आनखी त्या तारेत फसल्या जात होता. त्या वेदणेने तो ओरडत होता. तो फसल्या गेल्याने ग्रामस्थांच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून दोराने घट्ट बांधून घेतले आणि वन विभागाच्या गाडीत टाकत उपचाराकरीता घेवून गेले.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज….
रोही गावात आल्याची महिती वनविभागाला मिळाली होती. मात्र या रोह्याला पकडण्यासाठी वनविभागाचे केवळ दोनच कर्मचारी घटनास्थळी आले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने या रोह्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याला ज्या पद्धतीने बांधून गाडीत टाकले कोणत्याही पद्धतीची यावेळी काळजी घेण्यात आली नाही. यावरुन वनविभागाचे हे कर्मचारी प्रशिक्षीत होते की नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता.