

पवनार : माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी विदर्भाचा दौरा काढून पक्ष बळकटीकरण सोबतच शिवसैनिकांना धीर आणि बळ देण्याकरीता विदर्भ दौऱ्यावर आहे. आज रविवार (ता. ९) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नागपूरहून यवतमाळ येथे जात असताना स्थानिक नेत्यांनी त्यांचे पवनार येथे शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत जंगी स्वागत केले.
यावेळी शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ताफा पवनार येथे येताच पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. शिवसैनिकांनी भगवे ध्वज लहरवत जोरदार घोषणाबाजी करत जय-भवानी जय शिवाजीचे नारे दिले. यावेळी शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, सहसंपर्क प्रमुख रविकांत बालपांडे, जिल्हा प्रमुख अनिल देवतारे, जिल्हा प्रमुख प्रशांत शहागडकर, जिल्हा संघटीका संगीता कडू, सेलूच्या नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, पवनारचे उपसरपंच राहुल पाटणकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सदस्य पुरुषोत्तम टोनपे, उपजिल्हाप्रमुख तुषार देवडे, उत्तम आयवळे, निलेश बेलखेडे, प्रफुल्ल भोसले, भालचंद्र देेवरुखकर, रमेश कांबळे, भारत चौधरी, यांच्यासह काँग्रेस नेते शेखर शेंडे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे व कार्यकर्ते उपस्थित होते.