

हिंगणघाट : मालवाहू वाहनाच्या पंक्चर टायरची दुरुस्ती करणाऱ्या दोघांना मागाहून भरधाव आलेल्या ट्रकने जवळपास ५० फूट अंतरापर्यंत फरपटत नेले, हा अपघात २७ रोजी मध्यरात्री २:३० वाजताच्या सुमारास हिंगणघाट जवळून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही मृृतदेहांच्या चिंधड्या झाल्या. याप्रकरणी ट्रकचालकास हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश विठुलराव कळंबे (६४), ज्ञानेश्वर अण्णाजी महाजन (४९) दोन्ही रा. हिंगणघाट अशी मृतांची नावे आहे. तर पोलिसांनी ट्रकचालक अमीन साब बुरान साब रा. नागानकल राज्य कर्नाटक याला अटक केली आहे.
सुरेश कळंबे आणि ज्ञानेश्वर महाजन हे दोघे एम.एच. ३२ ए.जे. ३६९२ क्रमांकाच्या मालवाहूने हिंगणघाटकडे जात असताना अचानक मालवाहूचा टायर पंक्चर झाला. त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेट्रोलपंपासमोरील रस्त्याकडेला मालवाहू थांबवून पंक्चर झालेला टायर बदली करीत होते. दरम्यान नागपूरच्या दिशेने मागाहून भरधाव आलेल्या केए. ३४ सी. ७११६ क्रमांकाच्या ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालतून पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या दोघांनाही मागील चाकात घेत जवळपास ५० फूट अंतरावर फरपटत नेले. दोघांचाही जागीच मृत्यू झाला असून मृतदेहांच्या चिंधड्या उडाल्या होत्या. या दुर्दैवी घटनेने हिंगणघाट शहरात शोककळा पसरली आहे. हिंगणघाट पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. ट्रकचालकास अटक करून ट्रक पोलिस ठाण्यात लावल्याची माहिती दिली.