वर्धा : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून वर्धा जिल्ह्यात दारूची वाहतूक करणाऱ्या पाच जणांसह बार मालकाला अटक करण्यात आली. कारसह एकूण १० लाख ९५ हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने करण्यात आली. मुकेश राधेलाल जयस्वाल (रा. कळंब), मोहम्मद हसन मोहम्मद उस्मान अन्सारी (रा. सावंगी मेघे), राहुल मदनलाल कासोर (रा. पोद्दार बगिचा), गडू घनश्याम वैरागडे (रा. तेलीवॉर्ड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बार मालक मुकेश जयस्वाल आणि मोहम्मद हसन अन्सारी हे दोघे यवतमाळ जिल्ह्यातून दारू घेत वर्धा जिल्ह्यात वाहतूक करून दारूविक्रेते राहुल कासोर, गडू वैरागडे यांना विक्रीसाठी देत असल्याची माहिती होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला असता दोघांकडूनही मोठ्या प्रमाणात दारूसाठा मिळून आला. पोलिसांनी आरोपींकडून मोबाइल, कारसह तब्बल १० लाख ९५ हजारांचा दारूसाठा जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, गजानन लामसे, यशवंत गोल्हर, राजेंद्र जयसिंगपुरे, रितेश शर्मा, गोपाल बावनकर यांनी केली.