वर्धा : पत्रकार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी वर्ध्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील पत्रकार बांधव सहभागी झाले आहे. आंदोलनस्थळाला खासदार रामदास तडस यांनी भेट देत पत्रकारांच्या मागण्या संसदेत मांडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा मागण्यासंदर्भात चर्चा करून मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. या धरणे आंदोलनाला आमदार डॉ पंकज भोयर, जेष्ठ पत्रकार हरिभाऊ वझुरकर यांनी भेट दिली. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश कथले, नरेंद्र देशमुख, व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रमोद पाणबुडे, साप्ताहिक विंगचे अध्यक्ष वरून पांडे, एकनाथ चौधरी, किशोर कारंजेकर उपस्थित होते.
यावेळी आंदोलनात एकनाथ चौधरी यांनी व्हाईस ऑफ मीडियाची भूमिका स्पष्ट केली. तर किशोर कारंजेकर यांनी यावेळी आंदोलनाची गरज विशद केली. पत्रकार नरेंद्र देशमुख यांनी विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटीत आपली धरणे आंदोलनाची भूमिका मांडली. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना विविध मागण्याचे निवेदन देऊन मागण्या रेटून धरण्यात आल्या.
या धरणे आंदोलनात पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, पत्रकारितेत पाच वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जी एस टी कर रद्द करावा, पत्रकारांच्या घरासाठी विशेष बाब म्हणून हक्काचे घरासाठी शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकाराना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन पत्रकारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, वर्धा शहरात पत्रकार भवनाची निर्मिती करावी, अशा विविध मागण्यांसाठी पत्रकार बांधवानी धरणे आंदोलन केले आहे. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी धरणे आंदोलन स्थळी भेट देऊन पत्रकार बांधवांच्या समस्या समजून घेतल्या. लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मागण्या मान्य करण्याचा आग्रह करणार असल्याचे खासदार तडस यांनी सांगितले. याशिवाय संसदेत देखील यावर चर्चा करणार असल्याचे खासदार तडस म्हणाले. रेल्वे संदर्भाने असलेल्या पत्रकार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी देखील पावले उचलली जाणार आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी देखील धरणे आंदोलन स्थळी भेट दिली. विविध मागण्यांच्या संदर्भात धरणे मंडपात पत्रकार बांधवांशी चर्चा करण्यात आली. स्थानिक मुद्दा असलेले पत्रकार भवनाची मागणी मार्गी लावण्यासाठी तातळीने बैठक घेऊन प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन आमदार भोयर यांनी दिले आहे. यादरम्यान आजच्या धरणे आंदोलनाला विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या. युवा परिवर्तन की आवाज आणि आयटक या संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला. धरणे आंदोलन स्थळी साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कोटबकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप उटाणे, काँग्रेसचे सुधीर पांगुळ, बाळाभाऊ माऊसकर, वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष अजय घंगारे, शिवसेना जिल्हाध्यक्ष गणेश इखार, महेंद्र मुनेश्वर, राष्ट्रवादीचे वासुदेव कोकाटे यांनी भेटी दिल्या. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाणबुडे यांनी विविध सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते वाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी सदस्य याशिवाय जिल्हा भरातून आलेले विविध पत्रकार बांधव यांचे आभार मानले.
या आंदोलनात निलेश पिजरकर, अनिल गावंडे, मनिष शर्मा, चेतन व्यास, उमेश ताकसांडे, रमेश निमजे, प्रदीप जैन, महेश मुजेवार, बळवंत ढगे, आनंद धामणकर, सचिन पोकळी, दिलीप चव्हाण, राहुल काशीकर, वृणाल ढोक, अमित शामडीवाल, अरविंद गजभिये, पंढरी काकडे, प्रशांत अग्रवाल, दिनेश घोडमारे, प्रणिता राजूरकर, विलास मुन, निलेश अतकरे, सागर झोरे, अनिल पवार अविनाश नागदेवे यासह यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.