कारंजा (घाडगे) : स्वागत समारंभ आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या युवकांसमोर महामार्गावरील ट्रक काळ बनून उभा ठाकला. मध्यरात्री रस्त्याच्या मध्यभागी असलेला ट्र्क दुचाकीस्वारांना दिसला नसल्याने दुचाकी उभ्या ट्रकवर आदळून दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारच्या मध्यरात्री सव्वादोन वाजता नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर झाला. या घटनेने सावळी (खुर्द) या गावात हळहळ व्यक्त होत आहे.
चंद्रशेखर मारोतराव दिग्रसे (२७) व अंकुश उत्तमराव ढोबाळे (२६) दोघेही रा. सावळी (खुर्द) असे मृतकांची नावे आहे. कारंजा येथील घागरे परिवारातील स्वागत समारंभ चंदेवाणी फाटा येथील श्रीहरी लॉनमध्ये आयोजित होता. या कार्यक्रमाकरिता चंद्रशेखर आणि अंकुश हे दोघेही आपल्या गावावरून एम, एच. ४० ए. ए. ४६०५ क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा गावाकडे परतत असताना महामार्गावर तेलखेडे हॉटेल व बोरी फाटादरम्यान एम, एच, ४० बी. एल. ६९४६ क्रमांकाच्या उभ्या ट्रकला जबर धडक दिली. ट्रकचा चालक वैभवकुमार पांडे रा. वर्धमान नगर याने रस्त्याच्या
मध्यभागी हा ट्रक उभा करून ट्रकच्या आजूबाजूला काही सुरक्षित उपाययोजना केली होती.
ट्रकचे पार्किंग लाइटही बंद होते आणि त्याला रिफ्लेक्टरही नव्हते. त्यामुळे दुचाकीस्वारांना उभा असलेला ट्रक अंधारामध्ये दिसला नसल्याने भरधाव दुचाकी त्या ट्रकवर आदळली. यात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाले. याप्रकरणी कारंजा (घाडगे) येथील पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.